रणरणत्या उन्हात . . .
रणरणत्या उन्हात तापून आल्यावर,
विसाव्यासाठी हवी असते,
फक्त दोन फूट व्यासाची घनदाट सावली.
दीप राग गायल्यावर, मल्हार आळवण्याच्या तीव्र गरजेइतकी.
तसेच हवे असतात,
पावसात चिंब भिजून आल्यावर
“किती भिजलायस? सर्दी होईल नं” असं म्हणत
टॉवेल पुढे करणारे दोन प्रेमळ हात.
आणि मिळाली तर हवी असते,
कडाक्याच्या थंडीत थोडीशी मायेची ऊब
तसाच हवा असतो,
धक्का धक्कीच्या जीवनातून फलाटावर उतरल्यानंतर
एक निवांत एकांत.
त्या एकांतातली दोघांचीच दाटीवाटी.
जिथे मृत्यूचही भय नाही अशी हक्काची मांडी.
काम करून आखडलेल्या हातात जीव ओतणारे,
सुकोमल हात आणि
“फक्त माझ्यासाठी रे” किंवा “मी आहे ना?”
असंच काहीसं आश्वासन देणारे
दोन चमकदार डोळे.
तुझं . . . आणि तुझ्या डोळ्यांचं . . .
तुझं . . . आणि तुझ्या डोळ्यांचं बहुदा पटत नसावं.
नाहीतर, तू सांगण्याची वाट न पहाता त्यांनी,
तुझं गुपित माझ्याजवळ का बोलावं?
जे रडले माझ्यासाठी . . .
जे रडले माझ्यासाठी,
मी अडलो त्यांच्यासाठी.
पाकळी-पाकळी खुडली,
ज्यांनी गंध शोधण्यासाठी.
वसंतातल्या हिरव्या रानी,
मी झडलो त्यांच्यासाठी. जे रडले . . .
लांडगे उपाशी होते,
लचक्या लचक्यासाठी.
ज्यांनी किंमत केली नाही,
मी सडलो त्यांच्यासाठी. जे रडले . . .
आपापलेच होते ते,
ते होते त्यांचे त्यांचे.
जे नुरले माझ्यासाठी,
मी झुरलो त्यांच्यासाठी. जे रडले माझ्यासाठी, मी अडलो त्यांच्यासाठी.
कालच मला कळलं . . .
कालच मला कळलं,
माझा रक्तगट ’ओ’ आहे.
मला म्हणे फक्त देत राहायचंय
घेण्याच्या नावाने ‘भो’ आहे.
कबूल आहे की . . .
कबूल आहे की,
मी थोडी दिरंगाई केली.
पण तुला नाही वाटत,
तू सुद्धा थोडी घाई केली?
अळवाच्या संगतीत पाणी . . .
अळवाच्या संगतीत पाणी,
किती सुंदर छान दिसतं ! !
तो चिंब भिजावा म्हणून,
मनस्वी प्रयत्न करीत असतं.
आळवालाही ठाऊक असतं,
तरलतेचा भरोसा नसतो.
तो वरून वरून ओला दिसला
तरीही आतून कोरडाच असतो.
झाकल्या मुठींचा खेळ . . .
झाकल्या मुठींचा खेळ जुना झाला.
तू दोन मुठी समोर धराव्यास.
यातली एक निवड म्हणावंस.
मी निवडावी नेमकी रिकामी.
तु म्हणावस दुसऱ्या मुठीत.
तुला हवं ते सग्गळ होतं.
कुणास ठाऊक?
कुणी पाहिलंय?
पूर्वीच विसरून जा.
आता मी रिकाम्या मुठीच्या प्रेमात पडलोय.
मुठींचा खेळ जुना झाला.
मला कळून चुकलंय.
जो देणारा असतो तो खेळ करीत नाही.
तो देतो भरभरून दोन्ही हातांनी.
मुठी उघडून.
तेव्हा आता, असुदे.
मुठींचा खेळ जुना झाला.
मुठींचा खेळ जुना झाला.
निघताना का विचारतेस . . .
निघताना का विचारतेस ‘निघू का?’ म्हणून.
मी थांब म्हणालो तर थांबणार आहेस का?
क्षणभराची तुझी सोबत,
आयुष्यभरासाठी लांबणार आहे का?
जिथे हक्काने घ्यावं . . .
जिथे हक्काने घ्यावं,
तिथे मागु शकलो नाही.
ज्यांनी उपकार केले,
त्यांना सांगू शकलो नाही.
देतांना कधी तुझा . . .
देतांना कधी तुझा,
दात्यासारखा आव नव्हता.
उलट नेहमी चेहऱ्यावरती,
समाधानी भाव होता.