काही लिखाण
“तो कुठंय?”
ठक् ठक् ठक् ठक् ठक् ठक् ठक् ठक् ठक् न थांबता एका लयीत थोड्याश्या अधीरतेनं केलेली दरवाजावरची ठक् ठक् व सोबत “आद्विकच्या आई, दरवाजा उघडा मी आलेय.” अशी एकदम वरच्या पट्टीत स्वतःची करून दिलेली ओळख. आमचा दरवाजा बंद असला तरीही समोरच्या दरवाजावरचा हा प्रकार मला स्पष्ट ऐकू येत होता.
आद्विकच्या आईनं दार उघडल्या उघडल्या, काही विचारायच्या आत “मी आद्विकासाठी चॉकलेट आणलय, तो काय करतोय?” असं हक्कानं विचारत उत्तराची वाट न बघता त्यांनी दरवाजा धरलेल्या हाताखालच्या पोकळीतून चिमुकली सानिका घरात, आद्विकच्या शोधात पाळली असणार. १००%. कारण नंतर दरवाजा बंद केल्याचा आवाज ऐकू आला.
आद्विक, सिनिअर के जी. वय वर्ष सहा. आमचा छोटा शेजारी. त्याची मैत्रिण सानिका. ज्युनिअर के जी. वय वर्ष पाच. आमच्याच विंगमधे तळ मजल्यावर रहाते. एकूण त्यांच्या एकमेकांशी वागण्या वावरण्यावरून एकमेकांना भेटल्याशिवाय त्यांचा एकतरी दिवस जात असेल असं मला नाही वाटत. खाऊ असो, खेळणी असो, नवा ड्रेस असो कि इतर काही. आद्विक सानिकाला अगोदर दाखवणार. सानिकाचाही तसच.
परवा आला होता आमच्याकडे. तो आमच्याकडे असला कि आम्ही आमचा दरवाजा बंद करीत नाही. तो मला बाबा म्हणतो व हिला आई. त्याच्या आई बाबांना मम्मी-पपा.
“बाबा, काय कल्तात?” अजून थोडं बोब्लं आहे हे प्रकरण.
“काही नाही TV बघतोय. तू काय म्हणतोयस? तुझी मैत्रीण कुठे आहे?”
“लल्तेय ती.” आद्विक
“का?”
“मी वल्ती आलो नं, म्हनून”
“अरे असं नये करू”
“मग मला होम वल्क कलायचा ना?”
किती निरागस गुंतवणूक. खेळायला कधी हा तिच्याकडे जातो तर कधी ती वर येते.
असंच मागे एकदा खेळत होता आमच्याकडे. अलिखित नियमाप्रमाणे दोन्ही घरांचे दरवाजे उघडे होते. सानिका खालून वर आली ती त्यांच्या दरवाजावर, तोच वरच्या पट्टीचा स्वर “तो कुठंय?” तिला सांगितलं गेलं असेल ‘तो’ आमच्याकडे आहे. ती तशीच आमच्याकडे वळली. चिमुकलं फ्रॉक ते खाली बसलं, वेल क्रो सोडवून, चप्पल काढून ती आत आली. आद्विक हे सर्व ऐकत होता. तिला बघताच याची काळीही खुलली. असं खेळूया, तसं खेळूया, हे करूया, तू असं कर मग मी असं करेन वगैरे वगैरे प्लानिंग करत दोघंही एकमेकात रमली.
लापाछपी हा सानिकाचा आवाडता खेळ. याला पकडापकडी मधे रस. त्या दोघांपैकी एकानं डोळे झाकले कि दुसऱ्याला लपण्यासाठी जागा पटकन सुचवायचं काम इतरांचं. सानू कुठंही लपली आणि हा तिला शोधू लागला कि धीर न धरता लपल्या जागेवरूनच हि ओरडुन सांगणार “आद्विक मी इथे आहे” आणि मग हा तिला शोधून (?) काढणार. काय म्हणावं या भावनेला? काय अर्थ लावायचा याचा?
आपण लपलोय व तो आपल्याला शोधतोय. पण तो शोधू शकला नाही तर? त्यानं आपल्याला शोधून काढावं व आपण त्याला सापडावं असं जर आपल्याला मनापासून वाटत असेल तर या कामी आपणच त्याला मदत नको का करायला? म्हणजे आपण त्याला नक्की सापडू व त्याला आपल्याला शोधण्याचा त्रासही होणार नाही. आपणच लपायचं व शोधण्यासाठीचे संकेतही आपणच द्यायचे.
हा तर झाला एक पैलू त्यांच्या नात्याचा. पुढे काही वेळाने आद्विकच्या घरून दोघांनाही बोलावणं आलं. सानू धावतच सुटली. हिचे पायाचे तळवे जमिनीवर पूर्ण कधी टेकतच नसावेत. ते पिल्लू पहोचलं आद्विकच्या घरी त्याच्या अगोदर. हा मागून सावकाश चालत निघाला. निघतांना नेहमीप्रमाणे एखादं खेळणं आपण मागं विसरत तर नाही नं याची खात्री करुन घेत. दोन्ही हातात खेळणी सावरत आमच्या दरवाज्यापर्यंत पोहोचला. दोन हातातली खेळणी एका हातात केली, खाली वाकला, दुसऱ्या हाताने सानिकाची चप्पल, जी आमच्या दरवाज्याबाहेर होती ती उचलली, स्वतःच्या दरवाजाबाहेर ठेवली आणि मग आत गेला. मी फक्त आणि फक्त बघत राहिलो. लहान कोण? मी कि दोन चिमुरडी.
त्यांचं एकमेकांसाठी असणं, वागणं, वावरणं याचा अर्थ काढण्याच्या भानगडीत मी पडणारच नाहीये. तू हि तसा त्रास करून नको घेऊ. अशाने त्या निनावी नात्याचा अपमान होईल. निरागासातेच्याही पलीकडचं आहे ते. अपूर्व आहे. ते केवळ पाहावं, ऐकावं, अनुभवावं. अजूनही अधून मधून मी अंतर्मुख होतो. मी शांतपणे चित्र काढत असतो. आमच्या बंद दरवाजाआडून तिच्या येण्याची चाहूल मला लागते. ती त्याचा दरवाजा एका लयीत, शक्य तितक्या मोठ्याने, सलग ठोठावते. कुणीतरी दरवाजा उघडतं. आणि ती ठाम पणे वरच्या पट्टीत विचारते “तो कुठंय?
– ९ ऑगस्ट २०१७.
. . . . अन अवघा तावडे गाहीवरला.
आजूबाजूला सगळीकडे माणूस माणसापासून दूर जातोय. तो एकलकोंडा होतांना प्रत्यक्ष दिसत असतांना. अनेक नाती काळाच्या पडद्या आड नाहीशी होत असतांना. भावनांचा, जाणिवांचा,संवेदांनांचा लय होतांना दिसत असतांना. असहायपणे केवळ पहात राहण्यापलीकडे काही करू शकत नसल्याचा दुःख अनेक संवेदनशील मनांमद्धे घर करून असेल. अनेकांच्या मनात हा सल असेल. अश्या नकारात्मक विचारांसोबत परवा १० तारखेला रत्नागिरीजवळ आडीवरे गावी ‘तावडे अतिथि भवनाच्या’ लोकार्पण सोहळ्याला जाण्याचं योग आला. हा सोहळा, ‘क्षत्रीय मराठा तावडे हितवर्धक मंडळा’चा अमृत महोत्सव व ‘मराठा वधू वर सूचक मंडळाचा’ सुवर्ण महोत्सव असा त्रिवेणि संगम आयोजित केला गेला होता.
१० तारखेला सकाळी प्रत्यक्ष वस्तूच्या ठिकाणी पोहोचलो. बसमधून उतरून प्रवेशद्वाराजवळ दोन वळणं घेऊन मुख्य वस्तूला सामोरा गेलो आणि जिथल्या तिथे थबकलो. समोरची वास्तु नजरेत समावत नव्हती. नजरेत सामावली तरी मन भरत नव्हतं. अतिशयोक्ति वाटेल. ताजमहाल बांधला शाहजाहांने. सुंदर आहे तो. शनिवार वाडा पहा. खूप छान आहे. हे सगळे राजवाडे, वास्तु राजे राजवड्यांनी बांधले. सर्वाधिकार एकमेव त्यांचे होते. पण समजातल्या, आपापले संसार असलेल्या सर्वसामान्य माणसांनी एकत्र येऊन अशी देखणी वास्तु उभारण्याचं हे अपवादात्मक उदाहरण असेल. ‘तावडे अतिथि भवन’ उर्फ ‘तावडे वाडा’. काय बघू आणि किती बघू, कशाशी तुलना करु, कुणाला वर्णन करु काही सुचत नव्हतं. शेवटी ठरवलं, यातलं काहीही न करता या वस्तूचा मनसोक्त व स्वतंत्र आस्वाद घ्यायचा आणि पुढे सरकलो.
नंतर तीन दिवस त्या वस्तूच्या सहवासात राहून सुद्धा मन भरत नव्हतं. दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरी, वेगवेगळ्या कोनांतून तिचं देखणं रूप भुरळ घालत होतं. प्रत्येकवेळी तिच्याकडे बघतांना पहिल्यांदाच बघत असल्याचा भास होत होता. या वस्तूच्या इतर तांत्रिक माहितीबद्दल मी इथे काही बोलणार नाही आहे. ते माझं प्रयोजन नाहीये पण इथं वापरला गेलेला प्रत्येक चीरा, आत तसच प्रांगणात वापरलेला प्रत्येक दगड इथपासून ते कड्या कोयंडे निट व नेमके पारखून घेतलेले दिसत होते. खिडकी दरवाजाच्या तवादानांवरचं एंग्रेविंग पासून ते त्यांच्या स्टॉपर्स सारख्या बारीक गोष्टींचीही विशेष दाखल घेतलेली दिसत होती. अश्या छोट्या गोष्टींपासून ते वापरलेल्या मोठ्या मोठ्या चीरा, लाकूड, त्याचं पॉलिश, सज्जाच्या जाळ्या, प्रांगणात वापरलेला नैसर्गिक दगडी लादया यांच्या योग्य वापराने ही वास्तु इतिहास वदणारी व इतिहासात नोंद घेण्यास भाग पडणारी आहे यात शंका नाही. या सफलतेचं श्रेय कुणाला द्यावं? याचं श्रेय जातं एकात्मतेला. समाजाच्या एकत्र येण्याला. एका ध्येयाने प्रेरीत होऊन त्याच्या पूर्णत्वासाठी झपाटून काम करणार्या अनेक व्यक्तिमत्वांना. एकमेकांवरच्या विश्वासाला, श्रद्धेला, समजूतदारपणाला. या डोळ्यादेखतच्या उदाहरणाने मला आशा व खात्री वाटू लागली की अजूनही माणूस माणसापासून तुटलेला नाही. अजूनही अनेक लोक एका सामायिक विचाराखाली एकत्र येतात. आपल्या निस्वार्थ स्वप्नाला साकार करतात. ध्येय जर पवित्र असेल व स्वतः मधला स्व बाजूला ठेवायची तयारी असेल तर काहीही अशक्य नाही.
या लेखात या तीन दिवसांचा सविस्तर वृतान्त देणं हा ही माझा उद्देश नाही. परंतू या वास्तूकडे बघण्याचा माझा दृष्टीकोण जो सुरवातीला केवळ एक सुंदर, देखणी वास्तु असा मर्यादित होता, तो आमुलाग्र बदलला. मला जाणीव झाली की या वास्तूचा पाया हा अनेक भावनांच्या व मनोमन वाहून घेतलेल्या अनेक हृदयांच्या समर्पणावर उभा आहे. याला निमित्त होती ती त्या शेवटच्या दिवशी अगदी शेवटी घडलेली छोटेखानी अनौपचारिक बैठक.
सगळे कार्यक्रम ठरल्याप्रमाणे पार पडले. सर्वांना याचं समाधान होतं. भारतभरतून आलेले तावडे आपाआपल्या घरी परतू लागले. अगदी शेवटी उरले ते गेली चार वर्ष हे स्वप्न उराशी बाळगून पडेल ते काम करणारे ‘क्षत्रीय मराठा तावडे हितवर्धक मंडळाचे’ कार्यकर्ते व पदाधिकारी. संख्येने फार फार तर २० – २२ जण व त्यांची कुटुंब. सोबत या वस्तूचे शिल्पकार श्री संतोष तावडे, त्यांच्या सहधर्मचारिणी सौ. सिद्धि वाहिनी आणि सुपुत्र कु. _____. अध्यक्षांनी या कार्यक्रमाच्या समारोपाच्या भावना व आभार सहज भावनेने व्यक्त केले व संतोषजींना मनोगत व्यक्त करण्याची विनंती केली. सर्वांच्या नजारा संतोषजिंकडे वळल्या. कान आतुर झाले. गेली चार वर्ष ज्याने सर्वस्व ओतून, वास्तूचा ठिकाणी तळ ठोकून, आपलं दैनंदिन आयुष्य वार्यावर सोडून इथला कण अन कण स्वतःच्या देखरेखीखाली तपासून ही परमप्रिय शिल्पकृती उभी केली त्या कलाकृतीचे लोकार्पण करतांना खर्या जातिवंत कलाकाराचा कंठ दाटून न येता तर नवल होतं. तशाही अवस्थेत सहकार्यांच्या आग्रहास्तव संतोषजी उभे राहिले. निथळत्या डोळ्यांनी त्यांनी आपल्या सर्व बांधवांच्या कौतुकाचा स्वीकार केला. त्यांनी त्यांच्या सहाय्यकाला, अमरला जवळ बोलावलं. जो अगदी हे माळरान मंडळाने खरेदी केलं तिथपासून ते आज या लोकार्पणापर्यंत त्यांच्या व समस्त तावडेंच्या अखंड सोबत होता. त्यांनी त्याला स्वतःजवळची शाल पांघरून मिठीत घेतलं. बोलत कुणीच काही नव्हतं. तरीही भावना पोहोचत होत्या. मंनांकडून मनांकडे. दोघांचेही खांदे एकमेकांच्या अश्रुंनी ओले झाले. ‘गेल्या चार वर्षात मी आडीवरे आणि तावडे अतिथि भवन या पलीकडे कसलाही विचार केला नाही. आवाका मोठा होता. व्याप मोठा होता. जबाबदारी मोठी होती. नंतर नंतर तर हा गुंता खूप वाढत गेला. मग शेवटच्या दोन वर्षात काही सूत्र माझ्या पत्नीने, या माऊलीने हाती घेतली. व्यवहाराला थोडी शिस्त आली. हळू हळू माझ्यासोबत ती व माझा मुलगा आम्ही सारे यात मनोमन गुंतत गेलो. आता हा वाडा व आम्ही जणू एकरूप झालो होतो. आमचं घर, घरातले प्रश्न, घरगुती कार्यक्रम असा काही विषयच उरलाच नव्हता. सकाळी अंथरुणात डोळे उघडल्यापासून ते रात्री पाठ टेकेपर्यंत आमच्या ध्यानी, मनि, चर्चेत केवळ ही वास्तु. एकच विषय व एकच आशय ‘तावडे अतिथि भवन’. तहान भूक हरवून बसलो होतो आम्ही. आज जे स्वप्न आपण सर्वांनी मिळून पहिलं ते प्रत्यक्षात अवतरल्यावर आपल्या सगळ्यांच्या पसंतीस उतरलेलं पाहून माझं आयुष्य सार्थकी झाल्याचा अनुभव माला येत आहे. आभार कुणी कुणाचे मानायचे? मला यात मी काही केलय असं वाटतच नाही. तसं मी काहीच अधोरेखित करू शकणार नाही. अनेकांनी यात सहभाग घेतला, सहकार्य केलं म्हणून हे शक्य झालं. हे सर्व होत गेलं. माझं मलाही कळलं नाही. हे कार्य व्हावे ही तो श्रिं ची इच्छा. मी केवळ नाम मात्र. आज या वास्तुचं लोकार्पण झालं आणि आम्ही सर्व कुटुंबिय एका जबाबदारीतून मुक्त झालो. खरा प्रश्न आता आमच्यापुढे आहे. आता पूढे काय? आज रात्री घरी गेल्यावर, उद्या, परवा आम्ही एकमेकांशी काय बोलणार? एक अनामिक रितेपण जाणवतय. खायला येईल हे रितेपण. याची भरपाई कशी करावी याचं उत्तर आमच्यापाशी नाही.’ इथं मात्र या अवलियाचा बांध फुटला. शेजारी बसलेल्या वहिनींचेही डोळे वाहू लागले. एक नीरव शांतता…….आणि तिथे असलेला अवघा तावडे गाहीवरला.
अशा परिस्थितित आता ही वास्तु केवळ चिर्या मातीची इमारत न रहाता तिला या समर्पित कार्यकर्त्यांच्या स्वप्नपूर्तीच्या आनंदाश्रुंचा अभिषेक झाला होता. आता मला ते सत्य शिवाहून सुंदर असं मानवतेचं मंदिर भासू लागलं. त्याला एक आत्मा असल्याची जाणीव होऊ लागली. इच्छा असो नसो घरी परतणं भाग होतं. गेट मधून बाहेर पडतांना एकवार मागे वळून बघितलं. तावडे वाडा डोळ्यात पाणी आणि ओठांवर हसू आणून संगत होता ‘ये पुन्हा, वाट बघतो’.
मी केवळ एक तावडे आहे म्हणून नाही तर एक सहृदय कलाकार या नात्याने सर्वांना आवाहन करतो की आपले मन व जाणिवा जाग्या ठेऊन आपल्या सर्व आप्त स्वकीयांसह एकदा जरूर भेट द्या या ‘तावडे अतिथि भावनाला’.
मूळ लेख खालीलप्रमाणे
संपूर्ण स्त्री खूप कमी लोकांना मिळते..!!
अमृता प्रीतमचं हे वाक्य मी पहिल्यांदा वाचलं तेव्हा खूप तरुण होते मी..
पण तरीही आपण काहीतरी अफलातून वाचलंय हे लक्षात आलं होतं..
सुभाष मला गमतीने म्हणायचा, ‘मला थोडी डायल्युटेड मिथिला मिळाली असती, तर बरं झालं असतं. ही माझ्या नाकातोंडात जाते, झेपत नाही मला..!’ त्याच्या या म्हणण्याचा अर्थ मला तेव्हा नीट कळायचा नाही. आणि त्याला नीट सांगता यायचा नाही. तो अर्थ मला अमृता प्रीतमच्या या वाक्याने सांगितला. हेच वाक्य वाचल्यावर मला ते हळूहळू उमगत गेलं.
आज एका मैत्रिणीने पुन्हा या वाक्याची याद करून दिली.
‘संपूर्ण स्त्री खूप कमी लोकांना मिळते..!!
होय, खरंय हे.. तिच्या सगळ्या स्त्रीसुलभ भावना, तिचे सगळे आवेग, आवेश, तिने धरून ठेवलेले हट्ट, प्रेमात प्रत्येकवेळी उन्मळून कोसळेल की काय असं वाटणारी तिची टोकाची कोमल असोशी, आणि उगवत्या सूर्याबरोबर पुन्हा नव्याने तळपत उभी राहिलेली ती..!!
तिच्यावर कोसळणाऱ्याला, आपल्या कटाक्षांवर तोलून धरण्याची तिची शक्ती.. त्याला ‘थांबवून ठेवण्याची’ युक्ती.. या साऱ्यासह ‘पूर्ण’ असलेली स्त्री फार कमी लोकांना मिळते. तिला ‘धारण’ करणं सोपं नसतं..!! पण आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर असा एखादा पुरुष मिळणं हे परम भाग्याचे असते..
हा फक्त शारीर मामला नाहीये..!! स्त्री पूर्ण असते ती तिच्या बुद्धी आणि विचारांसह..!! शारीर संबंधांना बुद्धीचे अस्तर असते तेव्हाच ते संबंध मखमली आणि उबदार होतात, कालातीत होतात..!! पूर्णत्वाने स्वत:ला समर्पित करायला सिद्ध असलेली अशी स्त्री, ऐऱ्यागैऱ्या पुरुषाला झेपत नाही. तो पुरुष फक्त ‘नरोत्तम’ असून चालत नाही, तो ‘पुरुषोत्तम’ही असावा लागतो.
आपल्या स्त्रीच्या डोक्यात जे-जे येतं ते कुठलाही शॉक लावून न घेता, पूर्ण ऐकू शकेल, तिला त्याचे उत्तर देऊ शकेल, तिच्या बुद्धीवर आपल्या बुद्धीची लगाम कसू शकेल.. असा एखादा मिळणंही तेवढंच कठीण असतं. फार कमी स्त्रियांना असा ‘पूर्ण पुरुष’ लाभतो. अशी रत्नं जेव्हा एका कोंदणात येतात तेव्हा ती एकमेकांसाठी काहीही सहन करायला सिद्ध अस
जिथे अशी जोडी जमते तिथे त्यांच्या प्रेमात सुगंध आणि शराब यांचं मिश्रण असतं.. आयुष्यभर महकत आणि बहकत राहण्याची मोकळीक असते. त्यांना लौकिक जगाचे नियम लागूच नसतात. त्यांचं प्रेम अलौकिक असतं.. म्हणून अद्भुत असतं..!!
लेखिका माहित नाही परंतु खूप आवडले म्हणून देतोय…..
समीक्षण
यातलं पाहिलं वाक्य वाचलं तिथूनच हे कुठतरी खटकू लागलं. अशा विषयात मनाने विचार करायची सवय असल्याने त्याचा तार्किक कारण काही केल्या सुचत नव्हतं. ‘संपूर्ण स्त्री खूप कमी लोकांना मिळते..!!’. स्त्री किंवा पुरुष कुणालातरी मिळणं कसं शक्य आहे? ती काही कुणी वस्तू अथवा सोडत अथवा बक्षीस नाही नं! त्यामुळे या पहिल्याच विधानात कुठेतरी नशीब, कर्तृत्व किंवा विशेष प्राविण्य अपेक्षित असल्याचा भास होतो. इथेच आपल्या नकळत एक अदृश्य स्पर्धा सुरु होते. जिंकण्याची भावना जागी होते. मग अहंकाराचा चंचुप्रवेश होतो. तसाच गंध ‘तिला ‘धारण’ करणं सोपं नसतं..!!’ यातूनही येतो. ते खूप कठीण व दुर्लभ असल्याचा संकेत मिळतो. त्या आडून एक आव्हानात्मक सूर उमटू लागतो.
‘शारीर संबंधांना बुद्धीचे अस्तर असते तेव्हाच ते संबंध मखमली आणि उबदार होतात, कालातीत होतात..!!’ यात लेखिकेच्या पूर्ण आदरासह असं म्हणावसं वाटतं कि स्त्री–पुरुष संबंधामध्ये अथवा कुठल्याही भावनिक नात्यामध्ये बुद्धीचा प्रवेश झाला कि ती त्या नात्यातली निरागसता व्यापून टाकते. नातं जोडणं व टिकवणं यात केवळ मन आणि मन कार्यरत असावयास हवं. बुद्धी आली कि तिथे व्यवहार येतो. व्यापार येतो. देवाण घेवाण येते. मोज माप येतं. मनाचं तसं नसतं. बुद्धीनं घेतलेले निर्णय सिद्ध करता येतात, मनानं घेतलेले निर्णय केवळ मनाला कळतात, पटतात किंवा पटतही नाहीत. शरीर संबंधामधेही निर्णय मनाने घेतले तर ते अधिक योग्य ठरेल.
‘पूर्णत्वाने स्वत:ला समर्पित करायला सिद्ध असलेली अशी स्त्री…’ अथवा पुरुष यात समर्पणात समर्पणासाठी स्वतःला सिद्ध करावं लागत असेल, तयार करावं लागत असेल तर ते मिलन किती टिकाऊ असेल किंवा किती उत्स्फूर्त असेल किंवा किती मनापासून असेल असा प्रश्न पडणं स्वाभाविक वाटतं. समर्पण हि जाणून बुजून पूर्वतयारीनिशी करण्याची गोष्टच नाही. ती आपल्याही नकळत आपल्याकडून होऊन जाणारी प्रतिक्रिया आहे. समर्पित होतांना जर कुणी समोरच्याची लायकी, कुवत, ताकद पाहून समर्पित होणार असेल तर त्याला समर्पण कसं म्हणावं बरं? मला पेलण्याची ताकद तुझ्यात आहे कि नाही?, हा विचार ज्या क्षणी डोक्यात येतो तत्क्षणी तिथे स्वार्थ निर्माण होतो. स्वतःच्या समाधानाचा, आनंदाचा विचार प्राधान्याने केल्याची जाणीव होते. समर्पणात या विचारला जागा नसते. समर्पण हे समर्पण असतं. स्वतःला स्वतःच्या स्वत्वासह स्वतःच्या अंतापर्यंत वाहून घेण्याची भावना, नव्हे क्रिया. समर्पण म्हणजे विलीनीकरण. दोघांचं एक होणं. मी जर मी राहिलोच नाही तर मला पेलण्याचं आव्हान मी देऊच कसं शकेन? मला माझ्या जोडीदाराचा आनंद द्विगुणीत करायचा असतो. असं झालं तरच हे संबंध मखमाली व उबदार होतील.
जगात परिपूर्ण कोण आहे? तसं कुणीच नाही. पण तरीही वास्तवात प्रत्येक स्त्री – पुरुष आपापल्या जागेवर त्याच्या किंवा तिच्या वतीने स्वतःला परिपूर्ण मानत असतात. एका दृष्टीने ते योग्यही आहे. त्या त्या परिस्थितीत ती ती व्यक्ती तिच्या तिच्या जागी परिपूर्णच असते. आपल्याला ती अपूर्ण वाटते कारण ती आपल्या निकषात बसत नसते. त्याचा आदर प्रत्येकाने करायलाच हवा. एकमेकांच्या समीकरणात तंतोतंत बसणं हि कविकल्पना आहे. हे सत्य स्वीकारायलाच हवं. वास्तवात या विचाराचा प्रवेश झाला तर संघर्ष अटळ आहे. कलेचा किंवा कलाकृतीचा (कोणत्याही माध्यमातील) कल हा संघर्ष वाढवण्याकडे न असता तो कमी किंवा नाहीसा कसा होईल याकडे असावा. किमान सहनशील कसा होईल असा तरी प्रयत्न असावा.
‘तिच्यावर कोसळणाऱ्याला, आपल्या कटाक्षांवर तोलून धरण्याची तिची शक्ती.. त्याला ‘थांबवून ठेवण्याची’ युक्ती.. या साऱ्यासह ‘पूर्ण’ असलेली स्त्री फार कमी लोकांना मिळते.’ या विधानामुळे या विचारातली विसंगती अधिक वाढते. तिचा आवेग, तिचा आवेश, तिच्या स्त्री सुलभ भावना त्या पुरुषोत्तमाने पेलाव्या अशी अपेक्षा यातली पूर्ण स्त्री करते. याच वेळी त्याचे केवळ तिच्यासाठी असणारे कटाक्ष तोलण्यासाठी, तिच्या इच्छेप्रमाणे थांबवण्यासाठी ती तिच्या शक्ती आणि युक्तीचा वापर करते. त्या कटाक्षांना ती पचवू शकत नाही किंवा शकत असली तरी केवळ तिला माहित असलेल्या कारणाने आपली शक्ती व युक्ती वापरून थोपवून धरते, हा विचार एकांगी वाटतो. याला समर्पण कसे म्हणावे व तिला पूर्ण स्त्री कसे म्हणावे? स्त्री सुलभ म्हणून स्त्री चा एक स्वभाव व त्याला धरून तिच्या काही इच्छा, अपेक्षा ज्या नैसर्गिक आहेत. तसाच एक स्वभाव व तशाच आणि तितक्या इच्छा व अपेक्षा निसर्गाने पुरुषालाही दिल्या आहेत. या निसर्गाच्या देणग्या एकमेकांना पूरक असतात. त्यांचा आदर ठेवण्यानेच हे संबंध सुखकर व आनंदी होऊ शकतील.
थोडं अधिकचं स्वातंत्र्य घेऊन मी तर असं म्हणेन कि वरील सर्व विवेचन खूप गहन व मानसशास्त्रीय पातळीवर आहे. कुठलीही नाती जर एव्हढ्या गहन पातळीवर उभी राहत असतील तर त्यात कृत्रिमता येण्याची शक्यता आहे. स्त्री – पुरुष संबंधहि काही वेगळे नाहीत. उलट इतर नात्यांपेक्षा अधिक नैसर्गिक व संवेदनशील आहेत. मनुष्य हा देखील एक निसर्गनिर्मित प्राणी आहे. इतर प्राण्यांकडे नाही असं एक मन आहे त्याच्या जवळ. गुंते निर्माण होतात ते त्यामुळे व वाढत जातात तेही त्यामुळे. स्त्री आणि पुरुष जेंव्हा एकत्र येतात तेंव्हा त्यांनी केवळ आपण स्त्री व पुरुष आहोत एवढा भान ठेवलं तरी पुरेसं आहे. अधिकच्या झालरी जेवढ्या जोडाव्या तेवढ्या कमीच असतात. त्यांच्या वजनाने त्या नात्यातली निरागसता नाहीशी होते. निसर्गाने दिलेल्या देणगीतला आनंद हरवून जातो. किंबहुना त्याचा अपमान होतो. कुठतरी वाचलंय तत्वज्ञ, तत्ववेत्ता व्हायला खूप अभ्यास करावा लागतो. खूप पुस्तकं वाचावी लागतात. पण तो समाधानी नसतो. त्यामानाने लहान मुलं फार छोट्या छोट्या कारणांनीही मनमोकळी हसतात. कारण ती मनाने निर्णय घेतात बुद्धीने नाही.